। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग निहाय करण्यात येणार्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान पुष्पलता जगताप, संध्या जगताप, विजया जगताप, शितल जगताप यांच्यासह अनेक महिला वर्गाने घरोघरी भेटी देत स्नेहल जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. गेल्या काही दिवसात या प्रचार फेरींना वाढता पाठिंबा मिळत असून जनाधार प्राप्त होत आहे. हीच विजयाची हमी, अशी प्रतिक्रिया शिवसेना महिला आघाडीच्या तृप्ती रत्नपारखी यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केली आहे.
महाड शहरातील प्रभात कॉलनी, वेताळवाडी, कुंभार आळी, वीरेश्वर मंदिर आदी परिसरात पुष्पलता जगताप यांच्यासह महिला आघाडीच्या प्रचार फेरीची आयोजन करण्यात आले होते. ही निवडणूक इतर निवडणूकांपेक्षा वेगळी आहे. प्रथमच या मतदार संघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या महिला उमेदवार स्नेहल जगताप निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे आपल्या हक्काची लाडकी बहीण उभी असल्याने तिच्या विजयासाठी महिला आणि युवा वर्ग सक्रिय झाला आहे. नारीशक्ती जेव्हा-जेव्हा एकत्र येते त्यावेळेला इतिहास घडतो. तसेच, या विधानसभा मतदारसंघात नारीशक्तीच्या पाठबळावर इतिहासात नवीन नोंद होणार असल्याचा विश्वास येथील महिला वर्गाने व्यक्त केला आहे.
या प्रचार फेरीला माजी नगराध्यक्ष शिळीमकर, संजय चिखले, ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे, सुभाष शिवशिवकर,बंटी पोटफोडे, राजा सकपाळ, मयूर भुवड, नातेकर बंधू, रणजित नातेकर, सचिन शिंदे, बाबा शेडगे राजा मुळे, साहिल हेलेकर, नीता शेठ, तृप्ती रत्नपारखी, मनाली पोरे, पूजा जगताप आणि महिलावर्ग मोठ्या संखेने सहभागी झाला होता.