भारताच्या दीप्तीने रचला इतिहास

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारताच्या दीप्ती जीवनजीने जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर टी20 शर्यतीत 55.07 सेकंदांच्या विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. यासोबतच दीप्ती जीवनजी हिला पॅरिस ऑलिम्पिकनंतर होणार्‍या पॅरालिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळाला आहे.

पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. दीप्ती जीवनजीने अमेरिकेच्या ब्रायना क्लार्कचा विश्‍वविक्रम मोडला. तिने गेल्या वर्षी पॅरिसमध्ये 55.12 सेकंदांचा वेळ नोंदवला होता. तुर्कीच्या एसील ओंडरने 55.19 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले, तर इक्वेडोरच्या लिजनशेला एंगुलोने 56.68 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले. यापूर्वी, पॅरा अ‍ॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताच्या प्रीती पालने महिलांच्या 200 मीटर टी35 प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या मागील आवृत्तीत, भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यांसह विक्रमी 10 पदके जिंकली होती. जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 25 मे पर्यंत चालणार आहे.

Exit mobile version