| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील वरंध गावात ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण व मृदा नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली संलग्न रायगड शैक्षणिक संकुल महाड संचलित कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली येथील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मातीचा नमुना कसा घ्यावा, माती परीक्षणाचे महत्त्व, खतांचा संतुलित वापर आणि उत्पादनवाढीसाठी माती परीक्षणाचा होणारा फायदा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून योग्य व्यवस्थापन कसे करावे, याचे मार्गदर्शनही करण्यात आले. कृषीदूतांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन माती नमुना संकलनाची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिली. हे प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरले. प्राचार्य डॉ. व्ही.जे. गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एस. रायकर व विषयतज्ज्ञ प्रा. एन.व्ही. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कृषीदूतांमध्ये कौशल ठाकूर, रोहन निंबाळकर, स्वप्नील चव्हाण, गौरव काळे, हणमंत सुरवसे, प्रसाद केदार, अथर्व थोरवे आणि सार्थक पानसरे यांचा सहभाग होता.







