| पनवेल | प्रतिनिधी |
सकाळपासून वाढलेल्या उष्म्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. कडक उन्हामुळे रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास सूर्य जणू आग ओकत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत होते. दिवसभर प्रखर उन्हाचा तडाखा असतानाच दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊ लागला. आकाशात काळे ढग जमा होऊ लागल्याने काही काळ पावसाळी वातावरण निर्माण झाले. जोरदार वाऱ्यासह वातावरणात गारवा जाणवू लागल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पावसाच्या शक्यतेमुळे अनेकांनी आकाशाकडे नजरा लावल्या होत्या. दरम्यान, संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याने आकाशात उधळलेले केशरी, लाल आणि सोनेरी रंग पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले. खांदेश्वर सरोवर परिसरात हा निसर्गाचा देखावा अधिकच खुलून दिसत होता. सरोवराच्या पाण्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे पाण्याचा रंग बदलल्यासारखा भासत होता. क्षणाक्षणाला बदलणारे रंग आणि शांत पाण्यावर उमटणारे प्रतिबिंब यामुळे परिसराला एक वेगळीच सुंदरता प्राप्त झाली होती. या रम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक, तरुणाई तसेच छायाचित्रकारांनी खांदेश्वर सरोवर परिसरात गर्दी केली होती. निसर्गाच्या या मनमोहक रूपाने दिवसभराच्या उष्म्यानंतर नागरिकांना सुखद अनुभव दिला.







