| मिझोरम | वृत्तसंस्था |
विधानसभा निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंट या पक्षाने राज्यात सत्ता मिळवली आहे. लालदुहोमा यांच्या नेतृत्त्वाखाली झेडपीएम पक्षाने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सत्ताधारी पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सर्व 40 जागा लढवलेल्या काँग्रेसला अवघ्या एका ठिकाणी यश मिळाले आहे. भाजपला दोन ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे.
2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये झेडपीएम पक्षाला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे पक्षाचे प्रमुख असणारे लालदुहोमा यांनी देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. अशा नवख्या पक्षाने थेट सत्तेला गवसणी कशी घातली आहे.
झेडपीएम हा पक्ष नवीन असला, तरी त्यातील उमेदवार हे जनतेसाठी नवीन नाहीत. पक्षाचे प्रमुख असलेले लालदुहोमा हे तर इंदिरा गांधींच्या काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. ते केवळ मिझोरमच नाही, तर काँग्रेसला आणि जोरमथंगा यांना आणि जवळपास सर्वच पक्षांना ओळखून आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये जोरमथंगा सरकारविरोधात अगदी ग्राउंड लेव्हलला जाऊन प्रचार केला आहे. त्यांनी झोरम नॅशनलिस्टिक पार्टी नावाने स्वतःचा पक्ष सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी पाच लहान पक्षांना एकत्र घेत, झेडपीएम नावाने युती केली. याच युतीचे पुढे राजकीय पक्षात रुपांतर झाले.
