ठाण्यात म्हस्केंना भाजपचा फटका?

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

महायुतीत ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची ठरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अखेर त्यांचा बालेकिल्ला असलेली ठाण्याची जागा मिळवली. इथून ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हस्के हे शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. पण त्यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये असलेली नाराजी पाहता म्हस्के यांना फटका बसू शकतो.

नवी मुंबईतील भाजपचे बडे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसवर सकाळी 10 च्या सुमारास बैठक झाली. ठाण्याची जागा शिवसेनेला गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. संजीव नाईक गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढत होते. ते निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण तरीही ठाण्याची जागा शिंदेसेनेला सोडण्यात आल्यानं भाजपमध्ये नाराजी आहे. संजीव नाईकांच्या जागी विनय सहस्रबुद्धे, केळकरांना उमेदवारी दिली असती तरीही चाललं असतं. पण जागा शिवसेनेला का सोडली, असा भाजप कार्यकर्त्यांचा सवाल आहे. प्रचार करणार नाही. त्याऐवजी उटी, गोवा, म्हैसूरला जाऊ. मतदानाच्या दिवशी येऊ. मतदान कोणाला करायचे ते तेव्हा पाहू, असा प्लान पदाधिकार्‍यांनी केला आहे. तसे घडल्यास शिवसेनेचे उमेदवार म्हस्केंना निवडणूक जड जाऊ शकते.

Exit mobile version