पाच रेकॉर्ड्स रोहित शर्माच्या निशाण्यावर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषक विजयासाठी सज्ज झाला आहे. पाच ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय. भारतीय संघाचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. विश्वचषकात रोहित शर्माची बॅट तळपेल. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा चोपल्या होत्या. रोहित शर्माने पाच शतकांची रीघ लावली होती. यंदाच्या विश्वचषकातही रोहित शर्मा अनेक विक्रमांना गवसणी घालेल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा पल्ला गाठण्याची संधीही रोहित शर्माकडे आहे. रोहित शर्माला त्यासाठी फक्त आठ षटकारांची गरज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार मारण्याची किमया फक्त दोन खेळाडूंना करता आली आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल याने वनडेमध्ये 351 षटकार ठोकले आहेत. तर पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने 331 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा हा विक्रम विश्वचषकात मोडू शकतो.
सर्वाधिक षटकारांचा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माच्या दृष्टीक्षेपात आहे. अवघे तीन षटकार मारताच रोहित शर्मा क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होईल. रोहित शर्माच्या नावावर सध्या 551 षटकारांची नोंद आहे. रोहित शर्माने 471 आंतरराष्ट्रीय डावात 551 षटकार मारले आहेत. सध्या षटकारांचा किंग युनिवर्स बॉस आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत. हा विक्रम रोहित शर्मा विश्वचषकात मोडेल, यात शंकाच नाही.
वनडेमध्ये 950 चौकार रोहित शर्माने 22 चौकार मारताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 950 चौकार ठोखणारा सहावा भारतीय खेळाडू ठरु शकतो. याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, वीरेंद्र सहवाग, सौरव गांगुली यांनी 950 चौकार ठोकले आहेत.
विश्वचषकात एक हजार धावा रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 17 सामन्यात 978 धावा चोपल्या आहेत. आणखी 22 धावा काढताच रोहित शर्मा विश्वचषकात 1000 धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज होईल. याआधी सचिन, कोहली आणि गांगुली यांनी हा पराक्रम केला आहे.
18000 आंतरराष्ट्रीय धावा विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 18 हजार धावांचा पल्ला पार करु शकतो. त्यासाठी रोहित शर्माला 358 धावांची गरज आहे. विश्वचषकात 9 साखळी सामने होणार आहेत, त्यादरम्यान रोहित हा विक्रम करु शकतो. भारताकडून याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी 18 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.