करचुंडे पुलाच्या भिंतीला भगदाड; दुर्घटनेची शक्यता

| सुधागड-पाली | वार्ताहर |

पाली-खोपोली राज्य महामार्गावर सोमवारी (ता.14) सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा माणखोरे मार्गावरील करचुंडे गावाजवळील पुलाची (साकव) एक बाजू खचली असून, तिला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेत तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

जांभुळपाडा बाजूकडून माणखोरेकडे येताना करचुंडे पुलाच्या खालच्या बाजूची सिमेंट व दगडचा भाग ढासळून भगदाड पडले आहे. त्यामुळे पुलाला आधार देणार्‍या खांबाची (पिलर) ही बाजू कमकुवत होऊन पूल कमकुवत झाले असून, मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे एखाद्या मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. याबाबत अनेक वेळा तक्रारी व वर्तमानपत्रांमध्ये बातम्या लागूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही उपायोजना करण्यात आलेली नाही.

हा पूल जर खचला, तर अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच शाळा-महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या बस याच मार्गाने प्रवास करत असतात. माणखोरे पंचक्रोशीला बाजाराचे ठिकाण हे परळी असल्यामुळे या मार्गावर वाहनाची सारखी वर्दळ असते. अनेक गावांना जोडणारा हा पूल महत्त्वाचा दुवा असून, हा मार्ग माणगाव बु., माणगाव खुर्द, भेलीव, फल्याण, वासुंडे, पावसाळवाडी या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. पूल मोडकळीस आल्यास माणखोरेसह अनेक गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तात्काळ उपाययोजना करुन पुलाची वेळीच दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. जर या बाबींवर दुर्लक्ष केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

Exit mobile version