होळी रे होळी; रायगडात होळीचा जल्लोष

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
‘होळी रे होळी, खा पुरणाची पोळी’ अशी आरोळी ठोकत रायगडात होळी सणाची तयारी करण्यात आली आहे. सोमवारी रायगडात खासगी 1065 आणि सार्वजनिक 2887 अशा एकूण 3952 होळ्या प्रज्वलित होणार आहेत. या सणाच्या निमित्ताने पोलिसांचा पहारा वाढविण्यात आला आहे. होळी आणि रायगड यांचं अतूट असं नातं आहे. या सणानंतर गावोगावच्या ग्रामदैवतांच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ होत असल्याने नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई परिसरात वास्तव्य असलेले हजारो चाकरमानी गावाकडे येत असतात. यावर्षीही असेच हजारो चाकरमानी रायगडात दाखल होऊ लागलेले आहेत. यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

रायगडात यावर्षी 3952 होळ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रज्वलित केल्या जाणार आहेत. यामध्ये 2887 सार्वजनिक, तर 1065 खासगी होळ्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत राजकीय परिस्थितीचा परिणाम होळी सणात उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणाही सतर्क झालेली आहे. खबरदारी म्हणून सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गावरही वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसत आहेत. एसटीने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन जादा एसटी बसेस सोडल्या आहेत. याशिवाय खासगी वाहनातून प्रवाशांची वर्दळ प्रमाणात सुरुच आहे.

Exit mobile version