| महाड | प्रतिनिधी |
महाडमध्ये पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. त्यानंतर कायद्यात बदल करुन, तो अधिक प्रभावी करण्यात यावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी तहसीलदारांना देण्यात आले. राज्यामध्ये पत्रकारांवर प्राणघातक हल्ले होत असून, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वास्तविक, पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना त्याची अंमलबजावणी शासनाकडून योग्य प्रकारे केली जात नाही, याप्रकरणी संपूर्ण राज्यामध्ये संरक्षण कायद्याची होळी करून पत्रकारांनी आपला निषेध नोंदवला आहे.
महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या कायद्याची होळी केली. यावेळेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, कार्याध्यक्ष प्रसाद पाटील, सचिव श्रीकांत पार्टे, उपाध्यक्ष संजय भुवड, खजिनदार समीर बुटाला, रवी शिंदे, इलियास ढोकले, चंद्रहास नगरकर, राजेश भुवड, उत्तम तांबडे, मयुरी खोपकर, रोहन शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते. महाडच्या शिवाजी चौकात हे आंदोलन झाल्यानंतर तहसील कार्यालयात मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांना निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदार महेश शितोळे यावेळेस उपस्थित होते.