होळी रे होळी… जिल्ह्यात पाच हजार होळ्या उभारणार

32 ठिकाणी दोन दिवस काढणार मिरवणुका

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्ह्यामध्ये (दि.24) मार्च रोजी होळीनिमित्त चार हजार 985 ठिकाणी होळ्या उभारल्या जाणार आहेत. त्यांचे विधीवत पुजन करून दहन केले जाणार आहे. होळीनिमित्त जिल्ह्यात 32 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने रायगड पोलीस दलामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये होलिकोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. आबालवृद्धांपासून सर्वच मंडळी या उत्सवात सहभागी होतात. पारंपरिक पेहराव करून होळीला पुरणाची पोळी नैवेद्य देऊन पूजा केली जाते. त्यानंतर रात्री होळीचे दहन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही जपली जाते. ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी होळ्या उभारल्या जातात. वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम घेऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यात चार हजार 985 ठिकाणी होळ्या उभारल्या जाणार आहेत. काही ठिकाणी केळीचे झाड, तर काही ठिकाणी परंपरेनुसार सावरीचे झाड उभे केले जाणार आहे. त्याठिकाणी विधीवत पूजा करून हा सण साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यात दोन हजार 854 सार्वजनिक व एक हजार 131 खासगी होळ्या उभ्या केल्या जाणार आहेत. होळीनिमित्त 15 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. तर, दुसर्‍या दिवशी धुलिवंदन (रंगपंचमी) साजरा केला जाणार आहे. यावेळी रंगाची उधळण केली जाणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील 178 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. पोलीस ठाणे स्तरावर होलिकोत्सावाबरोबरच धुलिवंदनाच्या दिवशी ठिकठिकाणी पोलीस तैनात असणार आहे. जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकाचा हंगाम आहे. या हंगामात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस कटाक्षने प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवून राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देणयात आली आहे.

पर्यावरणपूरक होळी साजरी करा
होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर होळी जाळण्यासाठी लाकूड हवे म्हणून ठिकठिकाणी सर्रासपणे वृक्षतोड केली जाते. प्रामुख्याने सावर जातीच्या वृक्षांची अवैधपणे वृक्षतोड केली जाते. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून अनेक प्रकारे नैसर्गिक आपत्ती येत आहे. त्यामुळे आपले सर्वाचेच नुकसान होत आहे. होळीत अनेक ठिकाणी गोवर्‍या, लाकडे जाळली जातात. या प्रकारामुळे प्रदूषणातही भर पडते. परिणामी, पर्यावरणालाही धोका पोहोचतो. धार्मिक महत्त्व असल्याने याबाबतही नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध मंडळांनी एकत्र येऊन सार्वजनिकरित्या एकाच ठिकाणी होळी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या सणामध्ये कोणतीही वृक्षतोड करु नये तसेच कोणत्याही प्रकारे वन्यप्राण्याची शिकार करु नये. पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.

शहराच्या वाढत्या व्याप्तीमुळे सर्रासपणे वृक्षतोड केली जात असून, यामुळे पर्यावरणाला मात्र मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचत आहे. अवैधरित्या वृक्षतोड करणार्‍याविरोधात कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. वृक्षतोड केल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी एक ते पाच हजार रुपये दंड, तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार, होळी व धुलिवंदनच्या पार्श्‍वभूमीवर गावबैठका घेण्यात आल्या आहेत. पोलीस गस्तीसह ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीचा हंगाम असल्याने हा सण, आनंदात व शांततेत साजरा करण्याबरोबरच नियमांचे पालन करीत करावा, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. होळीमध्ये यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन अतिउत्साही करणार्‍यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासदेखील आली आहे.

श्रीकांत किरवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा
Exit mobile version