भारतीय समाज हा अत्यंत उत्सव प्रिय आहे. येथील बारा महिने हे कोणत्यातरी उत्सवाचेच असतात. भारतात सर्वत्र साजरा होणारा होळी हा म्हणजे एक लोकोत्सवच आहे. महाराष्ट्रात विशेषता ग्रामीण भागात होळीकोत्सव साजरा करण्याची मोठी परंपरा आहे. या प्रदीर्घ परंपरेला शिमगा किंवा होळी म्हणतात. जिल्ह्यात हा होळीकोत्सव जोरदारपणे साजरा केला जातो. होळीचे आजचे स्वरूप बदलले असले तरी येथील काही जुन्या परंपरा अजून कायम टिकून आहेत. प्रत्येक गावागावात वाडीवस्तीत होळीचा सण साजरा केला
महाडच्या शिमगोत्सवाची अनोखी परंपरा; देव-दानव युद्धाचा रंगतोय थरार
| महाड । वार्ताहर ।
महाड शहरातील शिमगोत्सव आगळा-वेगळा भासतो. गवळआळी मधील देव दानव युद्धाची परंपरा तंत्रज्ञानाच्या युगात आजही टिकून आहे. शिमग्याची आतुरता समस्त महाडवासीयांना लागून राहिलेली असते. त्यात विशेष करून गवळ आळी मधील जळकी लाकडं फेकण्याची व बोंब आजही ही प्रथा जशीच्या तशी तरुणांनानी टिकवून ठेवली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गावा-गावात शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिमगोत्सव निमित्त करण्यात आले होते. ग्रामदैवत जाकमाताचा होम लागल्यानंतर शहरातील सर्व होम लावण्यात आले. गावरान खालुबाजा पिपेरीच्या स्वराला नगाराचा आवाज व होळीच्या गाण्यांनी सर्वत्र वातावरण मंत्रमुग्ध करणारे ठरले. त्यात अनेक वर्षाची परंपरा शहरातील गवळआळी मधील उत्सव हा वेगळाच. पूजा केल्यानंतर होम लावल्यानंतर जळकी लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकण्याची परंपरा यालाच देव दानवाचे युद्ध असे म्हटले जाते. होमच्या दोन्ही बाजूला दोन्ही बाजूकडील रहिवासी एकत्र येतात आणि हातातील पेटत लाकूड समोरील रहिवाशांच्या अंगावर फेकतात. शेकडो पेटती लाकडं एक मेकांच्या अंगावर फेकली जातात. युद्धात कोणीही भाजत नाही. अथवा कोणीही जखमी होत नाही हे विशेष आहे. हा खेळ पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात.
कर्जत तालुक्यात होळी साजरी
| नेरळ । वार्ताहर ।
तालुक्यात ग्रामीण भागात सर्वत्र होळी सणाचा उत्साह होता. गवताच्या मोळीला आग लावून मनातील वाईट विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न होळीचे दहन केल्यानंतर केला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावात होळी सणाचा उत्साह होता आणि होळीच्या निमित्ताने शिमगा साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग दिसून आली. होळी सणासाठी सायंकाळी होळीच्या समोर पुरण पोळीचा नैवेद्य देण्याची प्रथा असून गावोगावी गावातील महिला हा नैविद्य दाखवत असतात. त्यानुसार गवताच्या मोळ्या रचून तयार केलेल्या होळीच्या समोर पुरण पोळी यांची गर्दी दिसून मध्य रात्रीचे सुमारास होळी पेटवली जात असल्याने सर्वत्र स्थानिक तरुणांनी कबड्डी आणि क्रिकेटचे गेम आयोजित करून रात्र जागून काढण्याचा प्रयत्न केला.
कर्जत, माथेरान या शहरात आणि नेरळ सारख्या शहर वजा गावात रात्री आठ पासून होळी पेटवली जात होती. गुजराती समाज आणि मारवाडी समाज यांच्याकडून रात्री नऊ पूर्वी होलिकोत्सव साजरा झाला. कर्जत आणि नेरळ मधील बाजारपेठ मध्ये होळी साजरी झाली. तर गावोगावी मध्यरात्रीचे सुमारास होळी पेटवली आणि त्यावेळी आरोळ्या देण्यात आल्या. तालुक्यातील ग्रामीण भागात किमान 900 ठिकाणी होळी पेटवल्या गेल्या आहेत, तर शहरी भागात 50 ठिकाणी होळी पेटवून सण साजरा करण्यात आला.
तळा शहरात पारंपारिक पद्धतीने होळी
। तळा । वार्ताहर |
तळा शहरात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण व धुळवड साजरी करण्यात आली. बारा वाड्यातील गावकर्यांनी लाकडे, गवत व फांद्यांनी आपापल्या होळया सजविल्या होत्या. होळी भोवती गावकर्यांनी फाग म्हणत देवांना आमंत्रण दिले व पाच तरुणांकडून होळी पेटविण्यात आली. जोगवाडी येथील मानाची होळी लागल्यानंतरच इतर सर्व होळया लागण्याची परंपरा शहरात आजही कायम आहे.
तसेच दुसर्या दिवशी शहरातील ग्रामस्थांनी सकाळी सात वाजता बाजारपेठेतून चंडिका देवीच्या मंदिरात धुळवड काढली. धुळवडीमध्ये कळकीच्या काठ्यांचा चुडा बनवून त्यावर फुलांचा तुरा डफावर बांधला होता. चुडा व होळीची धूळ घेऊन ग्रामस्थ नाचत मिरवणुकीने निघाली होती. धूळवडीमध्ये बाणकाठ्या व लाठीकाठीचा साहसी खेळ रंगला होता. पुसाटीची धुळवड मुस्लिम मोहल्ल्यातून जाताना ऐक्याचे प्रतीक दिसून आले. ग्रामदेवता चंडिका देवीच्या मंदिरात परंपरेनुसार होळी दहनाची राख एकमेकांना लावण्यात आली. धुळवडीच्या मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात आला होता.
म्हसळ्यात संस्कृती जपण्याचा प्रयत्न
| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यात केलटे, पाष्टी, दुर्गवाडी, खारगाव खुर्द (सखलप ) मजगाव-वाशी, सुरई, नेवरूळ, म्हसळा आदिवासी वाडी तालुक्यातील इतर गावामध्ये होळी परंपरा आजही जशीच्या तशी सुरु असल्याचे दिसून येते.
शहरात एकूण चार ठिकाणी होळी उत्सव केला जातो. त्यामध्ये सोनार-तांबट आळी, श्रीराम पेठकर होळी उत्सव, म्हसळा गौळवाडी होळी उत्सव आणि संपूर्ण म्हसळा शहरवासियांसाठी साजरा केलेला होळीच्या भव्य पटांगणातील होळी उत्सव, म्हसळ्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांची पालखी काढून त्यांना सानेवर पाच दिवस विराजमान केले जाते.