गृह विभाग, सिडकोचे अक्षम्य दुर्लक्ष
| उरण | वार्ताहर |
जेएनपीए बंदर परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृह विभाग व सिडकोने फुंडे ग्रामपंचायत सुसज्ज अशा द्रोणागिरी पोलीस ठाण्याच्या इमारतीची उभारणी केली होती. परंतु, गृह विभाग व सिडकोच्या दुर्लक्षितपणामुळे द्रोणागिरी पोलीस ठाण्याच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, सध्या फक्त इमारतीचा सांगाडा उरला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उरण तालुका हा मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर वसलेला विकसित तालुका आहे. या तालुक्यात केंद्र व राज्य अधिपत्याखाली असणारे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. तसेच जगाशी देवाणघेवाण करणारे जेएनपीए बंदर आहे. त्यामुळे या परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृह विभागाने सिडकोच्या व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या देखरेखीखाली द्रोणागिरी नोड तथा फुंडे ग्रामपंचायत हद्दीत लाखो रुपये खर्चून सुसज्ज अशा द्रोणागिरी पोलीस ठाण्याच्या इमारतीची उभारणी काही वर्षांपूर्वी केली आहे.
परंतु तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील (आबा) यांचे निधन झाल्याने गृह विभाग व सिडकोच्या अधिकारी वर्गाने द्रोणागिरी नोड तथा फुंडे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या द्रोणागिरी पोलीस ठाण्याच्या इमारतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सदर इमारत सध्या भग्नावस्थेत पडून राहिली आहे. सध्या या इमारतीचा ताबा सरपटणार्या प्राण्यांनी, आंबट शौकीनानी घेतला आहे. एकंदरी, गृह विभाग व सिडकोच्या दुर्लक्षितपणामुळे द्रोणागिरी ठाण्याच्या इमारतीचा उरला फक्त सांगाडा, तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गुहमंत्री देवेंद्र फडणवीस व नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जातीने लक्ष घालून सदर इमारतीच्या दुरवस्थेला जबाबदार कोण याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ही जनमानसातून करण्यात येत आहे.