| पनवेल | प्रतिनिधी |
निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याने होमगार्ड यांचा पनवेल शहर पोलिसांतर्फे सत्कार करण्यात आला. मतदान प्रक्रियेकरिता पनवेल शहर पोलीस ठाणेचा बंदोबस्त नेमण्यात आला होता. परंतु, मनुष्यबळ कमी असल्याकारणाने बाहेरून नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील 87 पोलीस अंमलदार व कर्नाटक एसआरपीचे एक सेक्शन तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील महिला व पुरुष असे 140 होमगार्ड बंदोबस्ताकरिता पुरविण्यात आले होते. होमगार्ड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा उचित सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना होमगार्ड इन्चार्ज यांनी सांगितले की, माझ्या बत्तीस वर्षीय सेवेमध्ये असा कुणीही सत्कार केला नव्हता. त्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. वपोनि नितीन ठाकरे यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत.