आरबीआयने केली रेपो रेट दरात कपात
। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय रिझर्व्ह बँकेनं सामान्यांना सुखद धक्का देत रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्सची कपात जाहीर केली आहे. यामुळं आता रेपो रेट 6 टक्क्यांवर स्थिरावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ धोरणामुळं भारतीय शेअर बाजारात हादरे बसत असताना, रिझर्व्ह बँकेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बुधवारी (दि.9) झालेल्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याची घोषणा केली.
फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर 3.61 टक्क्यांवर घसरला असून, जानेवारीतील 4.26 टक्क्यांच्या तुलनेत यात लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेपो रेट कपातीची अपेक्षा होतीच, आणि ती पूर्ण झाल्यानं सामान्य गुंतवणूकदार आणि कर्जदारांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणार्यांना होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं सलग दुसर्यांदा रेपो रेट कमी केल्यानं बँकांवर व्याजदर कपातीचा दबाव वाढला आहे. परिणामी, कर्जाचे हप्ते कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
शेअर बाजाराला नवी आशा
अमेरिकेच्या नव्या आयातशुल्क धोरणामुळं जागतिक बाजारपेठेत खळबळ माजली असताना, सोमवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स 2300 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 800 अंकांनी घसरला. अशा अस्थिर परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानं बाजाराला सकारात्मक संकेत मिळाले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा उसळी घेतल्यास गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परत येऊ शकतो.
कोणाला होणार फायदा?
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, 1 ऑक्टोबर 2019 नंतर फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेणार्यांचं दर बाह्य बेंचमार्कशी जोडलेलं आहेत. त्यामुळं रेपो रेट कमी झाल्यास बँकांना गृहकर्जावरील व्याजदरात कपात करावीच लागेल. याचा थेट फायदा नवीन गृहकर्ज घेणार्यांसह फ्लोटिंग व्याजदर असणार्या विद्यमान कर्जदारांना होईल. जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात 5 ते 25 बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. आता रेपो रेटच्या या नव्या कपातीमुळे कर्ज आणखी स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थोडक्यात, रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय म्हणजे कर्जदार आणि गुंतवणूकदारांसाठी एक खूशखबर आहे, ज्यामुळे आर्थिक चक्राला नवी गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.