गृहमंत्र्यांचा कर्जत तालुक्यातील खासगी दौरा

गोटफार्मचे केले उद्घाटन
। नेरळ । वार्ताहर ।
राज्याचे गृहमंत्री आणि गेली काही दिवस चर्चेत असलेले दिलीप वळसेपाटील हे कर्जत तालुक्याच्या खासगी दौर्‍यावर आले होते. कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथे यशराज बायोटेक्नॉलॉजी लिमिटेडने उभारलेल्या गोट फार्मचे उद्घाटन दिलीप वळसेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, आपल्या या खासगी दौर्‍यात गृहमंत्र्यांनी महाविकास आघाडीचे कर्जत तालुक्याचे नेते यांच्या घरी जाऊन पाहुणचार स्वीकारला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामपंचायतीमधील कोठिंबे येथे दहा एकर जमिनीवर उभारलेल्या गोट फार्मचे उद्घाटन करण्यात आले. राज्य सरकारमधील माजी सनदी अधिकारी अरविंद भानुशाली यांच्या यशराज बायो टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने उभारलेल्या या गोट फार्मच्या उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, आयआयएससी बंगलोर या संस्थेचे माजी संचालक के पदमनाभन, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
यशराज बायो टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या माध्यमातून 10 एकरात उभारलेल्या गोट फार्ममध्ये देशाच्या विविध भागात असलेले बोकड यांचे पुनवर्सन केंद्र उभारले आहे. त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारदेखील प्राप्त होणार आहे. त्या कार्यक्रमला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नारायण डामसे, रेखा देसले, स्थानिक कशेळे सरपंच राणे यांच्यासह माजी कृषी सभापती अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, स्थानिक नेते दिलीप ताम्हाणे, भास्कर देसले, माजी उपसरपंच विलास भला, आदिवासी संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष भरत शीद आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version