चांद्रयान-3ची घरवापसी; इस्रोचा प्रयोग यशस्वी

प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं
| बंगळुरु | वृत्तसंस्था |
चांद्रयान-3 मधील प्रॉपल्शन मॉड्यूल लूनार ऑर्बिटमधून आता पृथ्वीच्या कक्षेत परत आले आहे. त्यामुळे भारत अंतराळात यान पाठवून ते पृथ्वीवर सुरक्षितरित्या आणू शकते, हे इस्त्रोने जगासमोर सिध्द केले आहे.

विशेष म्हणजे, इस्रोने पहिल्यापासून याची योजना आखली नव्हती. ज्याप्रमाणे विक्रम लँडरची दुसरी उडी ही अगदी अनपेक्षितरित्या यशस्वी ठरली, त्याप्रमाणेच हा प्रयोगही यशस्वी ठरला आहे.

14 जुलै 2023 रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यात आले होते. 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून भारताने नवा इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला. यानंतर चांद्रयान-3 ने पुढील 14 दिवस अपेक्षित डेटा गोळा करून ही मोहीम फत्ते केली होती.

प्रज्ञान-विक्रम स्लीप मोडवर
चांद्रयान-3 मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे चंद्रावर स्लीप मोडवर आहेत. मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्लीप मोडवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर चंद्रावर रात्र सुरू झाल्यामुळे त्यांचे कामकाज बंद झाले होते. पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर लँडर-रोव्हरला सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याला अपयश मिळालं. यानंतर हे मिशन पूर्णपणे संपल्याची घोषणा करण्यात आली.

Exit mobile version