मुंबईत परप्रांतीय कामगारांच्या घरवापसीला सुरुवात

राज्यभरात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यामुळे आता परप्रांतीय कामगारांनी पुन्हा शहरात दाखल व्हायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवेळी लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन तब्बल 15 लाख मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील आपापल्या गावी परतले होते. मात्र, आता मुंबईतील लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर हे मजूर हळूहळू मुंबईत परतायला सुरुवात झाली आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे रोजगार ठप्प झाले होते. त्यामुळे मुंबईतील परप्रांतीय कामगारांची उपासमार होऊ लागली होती. त्यानंतर या मजुरांनी हजारो मैलांची पायपीट करत आपले गाव गाठले होते. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लॉकडाऊन लागण्यापूर्वीच अनेक परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला होता. राज्य सरकारने आवाहन करुनही हे मजूर आपल्या गावी गेले होते. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला होता.

मात्र, आता मजूर पुन्हा मुंबईत दाखल होऊ लागल्याने ही समस्या लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मुंबई महानगरापालिका प्रयत्न करत आहे. आम्हाला यश येत आहे. मात्र, अद्यापही धोका कमी झालेला नाही. दुसरी लाट थोपवली जात असली तरी तिसरी लाट अधिक धोकादायक आहे. मुंबई महानगरपालिका आगामी काळात वेगाने लसीकरण करण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्या घडीला मुंबईत दिवसाला 500 ते 600 रुग्ण सापडत आहेत.

Exit mobile version