। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील घरकुल योजनेतील लाभार्थी 3 हजार 177 कुटुंबांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी (दि.30) करण्यात आला. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्ग रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. लाभार्थी कुटुंबीयांना गृहप्रवेश करण्यासाठी गावागावात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे गावातील 4 कुटुंबांचा गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहूल पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, माजी सरपंच मिलिद कवळे यांच्यासह अलिबाग पंचायत समिती अधिकारी, वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनेंतर्गत मागील काही दिवसात मोठ्या संख्येने घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. कामे वेळेत पूर्ण करून लाभार्थी कुटुंबांना ताबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात घरकुल योजनांतर्गत 3 हजार 177 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. या घरकुलांमध्ये लाभार्थी कुटुंबियांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. यासाठी गावागावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गृहप्रवेश कार्यक्रमांचे आयोजन करून, लाभार्थी कुटुंबियांचा गृहप्रवेश करण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात 322 कुटुंबांचा गृहप्रवेश झाला असून, कर्जत 156, खालापूर 98, महाड 327, माणगाव 453, म्हसळा 102, मुरुड 154, पनवेल 147, पेण 402, पोलादपूर 97, रोहा 456, श्रीवर्धन 50, सुधागड 317, तळा 57, उरण 39 कुटुंबांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न झाला.
केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात 3 हजार 177 घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या घरकुलांचे गृहप्रवेश गुढीपाडवा शुभमुहूर्तावर एकाच दिवशी करण्यात आला आहे. यासाठी गावागावात गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गृहप्रवेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
डॉ. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड
आज आम्हाला निवारा प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजनेतून आम्हाला घर बांधून मिळाले. याबाबत प्रशासनाचे आभार.
अरुणा पवार,
लाभार्थी, वरसोली