सीबीआय चौकशीची नातेवाईकांची मागणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील शीघ्रे गावातील क्रिकेट खेळणारा तरुण खेळाडू आफताब टाके याचा शुक्रवारी (दि. 21) रोजी मृत्यू झाला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत मानवाधिकार मिशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे आफताब टाकेच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.
मानवाधिकार मिशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे यांच्याकडे आफताबच्या आईने शनिवारी (दि.29) रोजी आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला. मुलाची हत्या त्याची प्रेमिका, तिचे वडील आणि भावानेच केली असल्याचा आरोप आफताबच्या आईने रशाद करदमे यांच्याकडे केला आहे. त्यानुसार रशाद करदमे यांनी नातेवाईकांकडून आफताबच्या मृत्यूबाबतची सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना सांगितले कि, आफताबचा मृत्यू होण्याच्या दिवशी त्याच्या प्रेमिकेने आफताबच्या घरी येऊन त्याच्या आईला आफताबला वाचावा, असे सांगितले होते. त्याअगोदर आफताब टाकेला प्रेमिकेच्या भावाने मोबाईलवरून धमकी दिली असल्याचे आफताबच्या आईने मानवाधिकार मिशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे यांना सांगितले. आफताब टाकेच्या मोबाईलवरील दोन दिवसांपूर्वीची संभाषणे, साडी बांधून घेतलेल्या गळफासाची छायाचित्रे, आफताबच्या डाव्याबाजूच्या चेहर्यावर असणार्या खुणा, प्रेमिकेच्या भावाने दिलेल्या धमक्या, घटनास्थळी असणारी दुचाकी आणि रुग्णालयातील डॉक्टरांचा मृतदेह दफन करण्याचा तगादा यावरून आफताबच्या मृत्यूवर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असल्याचे मानवाधिकार मिशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.