माथेरानमधील स्थानिकाचा प्रामाणिकपणा

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील स्थानिक व्यावसायिक धोंडू बाबू कदम यांना शारलोट तलाव परिसरात पर्यटकाची बॅग रस्त्याच्या कडेला सापडली. कोणतीही अभिलाषा न बाळगता कदम यांनी सदर बॅग माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्याकडे सुपूर्द करून आपल्या प्रामाणिकपणाने दर्शन घडविले आहे.

धोंडू बाबू कदम यांचा एको पॉईंट येथे छोटेसा स्टॉल आहे. बुधवार, दि.26 रोजी सायंकाळी त्यांना एको पॉईंटहून शारलोट तलावाकडे जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग सापडली. त्यांनी लागलीच ती बॅग घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि ती बॅग सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्या स्वाधीन केली. यामध्ये पैशाचे पाकीट आणि दोन मोबाईल होते. सदरची बॅग डोंबिवली येथील पर्यटकाची असल्याचे तपासात समजले.

अलीकडच्या काळात समाजातील प्रामाणिकपणा, खरेपणा हरवत चालला असल्याचे चित्र अनेकवेळा दिसत आहे. तसेच दिवसेंदिवस दुर्मिळ होत असलेला माणसातला जाणतेपणा आणि माणुसकीदेखील कमी होत चालली आहे. असे असताना माथेरानमधील या स्थानिक स्टॉलधारकाने रस्त्यात मिळालेली बॅग परत केली. त्यांच्या या निःस्वार्थीपणाचे आणि प्रामाणिकपणाचे सर्व माथेरानमधून कौतुक होत आहे.

Exit mobile version