| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एका ग्राहकाने आपल्याला जास्त आलेली रक्कम परत देऊन आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला. तालुक्यातील गिरणे येथील आत्माराम महादेव म्हात्रे यांनी दोन हजार रुपयांचे चलन भरले होते. त्यावेळी स्टेट बँकेचे कॅशीअर स्वप्नील पवार यांनी त्यांना पाचशेच्या चार नोटा दिल्या. परंतु महादेव म्हात्रे यांनी आपल्याला सुट्टे पैसे देण्याची विनंती कॅशीअर यांना केली असता, अनावधानाने कॅशिअर स्वप्नील पवार यांनी त्यांना दोन हजार ऐवजी चार हजार रुपये लावलेल्या स्थितीत दिले. ते पैसे घेऊन ग्राहक आत्माराम म्हात्रे हे आपल्या घरी गेले असता त्यांना आपल्याला दोन हजार रुपये जास्त आल्याचे त्यांच्या लक्षात आले. शनिवारी महाशिवरात्रीची सुट्टी व रविवार देखील बँकेला सुट्टी असल्याने आत्माराम म्हात्रे यांनी सोमवारी स्टेट बँक गाठत आपल्याला दोन हजार रुपये रक्कम जास्त आल्याची माहिती बँकेचे प्रबंधक रवि कुलसंगे यांना दिली. आपल्याला आलेली दोन हजार रुपयांची जास्त रक्कम प्रामाणिकपणे त्यांना सुपूर्द केली. त्यांनी दाखविलेल्या या प्रमाणिकपणाबद्दल बँकेचे शाखा प्रबंधक रवि कुलसंगे, कॅशीअर स्वप्नील पवार, सुरक्षा रक्षक अंकुश साळुंखे तसेच बँकेच्या सर्व कर्मचारी वर्गाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.