रोहन तांबेचा प्रामाणिकपणा

पाच तोळ्याचे गंठण, रोख रक्कम, महागडा मोबाईल केला परत
| महाड | प्रतिनिधी |
सध्याच्या काळात महागाईमुळे सर्वसामान्य माणूस बेहाल झाला आहे. घर, कौटुंबिक खर्च भागवताना सर्वसामान्य माणसाची दमछाक होत आहे. अशा या महागाईच्या काळातदेखील प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण रायगड जिल्ह्यातील खरवलीतून समोर आले आहे. येथील रोहन संतोष तांबे या तरुणाला सापडलेला लाखो रुपयांचा ऐवज त्याने परत केल्याने त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

रोहन तांबे हा महाड एमआयडीसीतील कारखान्यात काम करतो. त्याला आकले- भोराव रस्त्यावरील पुलानजीक एक पर्स सापडली. या पर्समध्ये पाच तोळ्याची गंठण, रोख रक्कम असा ऐवज होता. रोहनला या पर्समधील पैशाचा मोह आला नाही. त्याने या पर्सच्या मालकाचा शोध घेण्याचा निर्णय घेत आपले मित्र जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांच्याशी संपर्क केला. रामदास चव्हाण यांनी त्यांना त्या पर्सचा एक फोटो बिरवाडी विभागातील सर्व ग्रुपवर व्हायरल केला आणि काही वेळातच पर्सच्या मालकाचा शोध लागला. बिरवाडी येथील खाटीक व्यावसायिक जयेश कांबळे या दांपत्याची ही पर्स होती. पर्स हरवल्याने शोधाशोध केल्यानंतरदेखील पर्स मिळत नसल्यामुळे कांबळे कुटुंब हताश झाले होते. पर्स मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर एकच आनंद पहायला मिळाला. प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे हे रोहन तांबे या तरुणाने दाखवून दिले असून, रोहन तांबे यांच्या या प्रामाणिकपणामुळे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Exit mobile version