| माणगाव | प्रतिनिधी |
उषःकाल फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिक्षण आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या गुणवंत व्यक्तींचा द्वितीय सन्मान सोहळा दि. 8 जानेवारी येथे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर इथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन होत्या. कार्यक्रमाला लिंगभाव क्षेत्रात उल्लेखनीय राज्यभर कार्य करणार्या आरती नाईक, आविष्कार नर्सरीचे प्रमुख संदेश कुलकर्णी, साम टीव्हीच्या पत्रकार सोनाली शिंदे आणि उषःकाल फाउंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सेवा यात तळागाळात उत्कृष्ट कार्य करणार्या गुणवंत व्यक्तींचा गौरव करण्यात आला. उषा शिंदे आणि आदिप शिंदे यांच्या कार्याची स्मृती अनेक लोकांनी जागविल्या.
आपल्या भाषणात कार्यक्रमाच्या अध्यक्ष समाज सेविका उल्का महाजन यांनी उषःकाल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. संदेश कुलकर्णी यांनी उषःकाल फाऊंडेशनने वारक आणि वरसोली या दोन शाळा डिजिटल केल्याचा आवर्जून उल्लेख केला. उषःकाल फाउंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे यांनी फाऊंडेशनचे कार्य हेच आपल्या उरलेल्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे याचा उल्लेख केला. या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर, वारक ग्रामस्थ, साईनगर पुर्व रहिवासी संघ आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सर्वांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.