मानाच्या दहीहंडीचा मानकरी गावदेवी गोंधळपाडा

भोनंगमधील जय हनुमान महिला गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

तरुणासह गोविंदा पथकांच्या सन्मानाची, अलिबागमधील मानाची दहीहंडी फोडण्याचा मान गोंधळपाडा येथील गावदेवी पुरुष गोविंदा पथकाने मिळविला. या पथकाला एक लाख 31 हजार 111 रुपयांचे बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच भोनंग येथील जय हनुमान महिला गोविंदा पथकाने अंतिम फेरीत चार थर रचून दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक मिळवला. या पथकाने 51 हजार 111 रुपयांचे बक्षीस पटकाविले. या विजेत्या गोविंदा पथकांना मानाची गदा देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

1 / 6


शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित अलिबागमध्ये शेतकरी भवन समोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या उत्सवामध्ये एकूण 53 गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये 29 पुरुष गोविंदा पथक आणि 24 महिला गोविंदा पथकाचा समावेश होता. सायंकाळी चारनंतर सलामी देण्यास सुरुवात झाली. मनात जिंकण्याची जिद्द ठेवून अनेक गोविंदा पथकाने चार, पाच, सहा, सात थरांचे मानवी मनोरे उभारले. एक वेगळा जल्लोष, गोविंदा पथकांचा थरार या सलामीच्या माध्यमातून पहावयास मिळाला.

पुरुष गटातील अलिबाग कोळीवाडा, मरीआई मेटपाडा, आणि गोंधळपाडयातील गावदेवी गोविंदा पथकांची अंतिम फेरीत निवड झाली. चिठ्ठी सोडत पध्दतीने दहीहंडी फोडण्याचा मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये गोंधळपाडा येथील गावदेवी गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा पहिला मान मिळाला. या पथकाने सात मानवी मनोरे उभारून ही दहीहंडी फोडण्याचा सन्मान मिळविला. महिला गटातील जय हनुमान महिला गोविंदा पथक भोनंगने पहिल्याच प्रयत्नाने चार थर रचून दहीहंडी फोडून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरला. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, अ‍ॅड. गौतम पाटील, प्रदिप नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

प्रशांत नाईक मित्र मंडळाची मेहनत 
शेकाप पुरोगामी युवक संघटना अलिबाग, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडीच्या उत्सवाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. हा सोहळा दरवर्षी जल्लोषात साजरा केला जातो. यंदाही अलिबागमध्ये शेकाप भवन समोर दहीहंडी सोहळा साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सव अतिशय चांगल्या पध्दतीने साजरा व्हावा,म्हणून प्रशांत नाईक मित्र मंडळाने प्रचंड मेहनत घेतली. एकूण नऊ पथक तयार करण्यात आले. मंडळाच्या शंभरहून अधिक सभासदांनी प्रथमोपचारापासून दिलेली वेगवेगळी जबाबदारी चोखपणे बजावत हा उत्सव आनंदमय व मंगलमय वातावरणात साजरा केला. यावेळी शेकापचे महिला व पुरुष कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते.
सलामी देणार्‍या गोविंदा पथकांचा सन्मान
* महिला गोविंदा पथकाने
चार थरांची सलामी दिल्यास पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला अकरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. यामध्ये 17 महिला गोविंदा पथकाने चार थरांचे मनोरे उभारून सलामी दिली असून सात गोविंदा पथकाने पाच थरांचे मानवी मनोरे उभारून सलामी दिली.

* पुरुष गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिल्यास पाच हजार रुपये व सहा थरांची सलामी दिल्यास अकरा हजार बक्षीस होते. बारा गोविंदा पथकाने सहा थर तर 17 गोविंदा पथकाने पाच थर लावून सलामी दिली. या गोविंदा पथकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
महिला गोविंदा पथकांचा सन्मान
शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात 24 महिला गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. यामध्ये अनेक महिलांनी चार व पाच थरांची सलामी देऊन बहूमान मिळविला. दहीहंडी फोडण्याच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या चिद्बादेवी महिला गोविंदा पथक कुरुळ, मी अलिबागकर महिला गोविंदा पथक, पाचनाका महिला गोविंदा पथक, पोहरावदेवी शास्त्रीनगर महिला गोविंदा पथक, श्रीदत्त महिला चेंढरे महिला गोविंदा पथक आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौैरव करण्यात आला. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर संजना किर, प्रिती झुंजारराव आदी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
75 हजारहून अधिक नागरिकांनी पाहिला ऑनलाईन उत्सव
दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदा पथकासह नागरिकांच्या सुरक्षेसाठीदेखील व्यवस्था केली होती. महिलांची छेडछाड होणार नाही. याकडेेदेखील लक्ष देण्यात आले होते. प्रशांत नाईक मित्र मंडळासह शेकापचे कार्यकर्ते पुरुष व महिला वर्गांनी प्रचंड मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारोच्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती झाली असताना सुमारे 75 हजारहून अधिक नागरिकांनी हा उत्सव ऑनलाईन पाहिला.
Exit mobile version