गजानन पाटील यांचा सन्मान

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचा विशेष पुरस्कार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील नवगांव येथील रहिवासी, थळ येथील आरसीएफ कंपनीचे माजी कर्मचारी गजानन नथु पाटील यांचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला. कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन-दसरा चौक येथे सोमवारी (दि.14) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. उत्कृष्ट समाजसेवेबद्दल राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचा विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या गुणवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

गजानन पाटील हे मानवता सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून समाजाच्या दुर्बल घटकांसाठी काम करत आहेत. दिव्यांग, अनाथ, आदिवासी आणि पिवळी शिधापत्रिका असलेल्या गरीब कुटुंबांसाठी ते शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करत आहेत. विशेषतः गरजूंना शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, साडी फॉल बिडिंग मशीन यांसारख्या आर्थिक उपजीविकेच्या साधनांचे वितरण करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी शेतकरी वर्गाच्या विकासासाठीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. खत नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि (सगुणा राइस टेक्नोलॉजी) यासारख्या तंत्रज्ञानाची जनजागृती करून शेतकर्‍यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यास पाटील यांनी प्रोत्साहित केले आहे. शेतकर्‍यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. यामध्ये फवारणी यंत्र, ताडपत्री, गोबर गॅस, सोलर पंप, विहीर बांधणे यासारख्या योजनांचा समावेश आहे. आदिवासी समाजासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून त्यांच्यात सामाजिक एकात्मतेची भावना रुजवण्याचे कार्य केले आहे. गरजू मुलांना वह्या, खाऊ वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करून त्यांनी समाजसेवेत आपली अमूल्य कामगिरी बजावली आहे.

या सन्मान सोहळ्यात पाटील यांचे योगदान समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे नवगाव गावातील, अलिबाग तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अभिमानाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील आणि अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

Exit mobile version