डॉ. राजेश पाचारकर मित्र फाऊंडेशनचा उपक्रम
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व समाजातील अन्य महत्त्वपूर्ण घटक यामध्ये सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्व दुवा असणार्या आशा सेविका या ग्रामीण आरोग्याची खरी हिरो आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेश पाचारकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली पंचतन येथे आशा सेविकांना मार्गदर्शन करताना केलं.
गेली आठ वर्षे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या मित्र फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबवणारे डॉ. राजेश पाचारकर यांच्यावतीने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवार दि.21 मार्च रोजी आशा सेविकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना तुम्ही योग्य आहार घेण्याबरोबरच आपल्या आरोग्याचीसुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा आणि योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांना आरोग्य सेवांचा योग्य वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या आशा सेविकांच्या कामाचे महत्त्व अनमोल आहे. पण, त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्यांना योग्य मानधन, प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या अधिक प्रभावीपणे काम करू शकतील आणि ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यात सुधारणा घडवू शकतील. तुम्ही गावात फिरताना कोणत्याही गरजू रुग्णाला आरोग्यविषयक काही मार्गदर्शन अथवा उपचारासंदर्भात काही सहकार्याची आवश्यकता असेल तर मला अथवा आमच्या फाऊंडेशनच्या कोणत्याही सदस्यांना संपर्क करा, माझ्याकडून शक्य तितकी मदत करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर कोठुळे यांनी डॉ. राजेश पाचारकर पंचक्रोशीमध्ये राबवीत असलेल्या सेवाभावी उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मदत होते, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राला वेळोवेळी लाभणार्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करुन त्यांच्या सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुर भाटीवाल, सर्व आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आरती राजेश पाचारकर, सह्याद्री महिला ग्रामसंघ व दिशा प्रभाग संघाच्या अध्यक्ष मानसी जाधव, दिशा प्रभाग संघाच्या कोषाध्यक्ष संजिवनी आंजर्लेकर, ज्योत्स्ना हेदूकर, संतोष कांबळे व आशासेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आशा सेविकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल आशा पर्यवेक्षक शिल्पा पारकर यांनी डॉ. राजेश पाचारकर यांचे मनापासून आभार व्यक्त केले.