शेकापतर्फे महिलांचा सन्मान

खेळ पैठणीसह महागरब्याचे आयोजन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील पुरस्कृत शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडीच्यावतीने तसेच पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ, अलिबाग आणि चेंढरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आशा सेविकांचा स्नेह मेळावा आणि महागरबा या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये रविवारी (दि.25) दुपारी 3 वाजल्यापासून रंगणार आहे.

कोजागिरी निमित्त कार्यक्रमांचे खास आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे आणि अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडीच्यावतीने दूपारी 3 वाजल्यापासून ‌‘आशा सखी‌’ स्नेह मेळावा होणार आहे. यावेळी ‌‘खेळ पैठणीचा‌’ हा खेळ रंगणार असून, ‌‘पैठणी क्वीन‌’ ही स्पर्धा देखील होणार आहे. या खेळाबरोबरच मनोरंजन आणि महिलांचा पैठणी देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच, पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ, अलिबाग आणि चेंढरे मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने एक रंगतदार आणि धमाकेदार फॅन्सी “महागरबा” रंगणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, गरब्याचा ताल आणि कोजागिरीच्या चांदण्यात धमाल करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. यावेळी आकर्षक बक्षीसेदेखील असणार आहेत. या कार्यक्रमात फॅन्सी गरबा किंग आणि गरबा क्वीन ही स्पर्धा होणार आहे. त्यातील विजेत्याला आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

Exit mobile version