। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक पुरस्कार सोहळा सुरबा नाना टिपणीस सभागृहात सोमवारी (दि. 17) पार पडला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या हस्ते आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा सन्मान करण्यात आला. बाल व माता मृत्यू रोखणार्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.
पोषण आहाराचा अभाव असल्याने मातासह बालके मृत होण्याचा धोका अधिक असतो. हा धोका टाळण्यासाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक काम करतात. त्यांच्या पुढाकाराने माता व मृत्यू प्रमाण रोखण्याचा प्रयत्न केला जातो.
गावागावातील घराघरात जाऊन सेवा देणार्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा दरवर्षी सन्मान केला जातो. यावर्षी देखील या महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणार्या ज्योत्स्ना शिंदे, संगिता भिंगारकर, अरुणा पाटील या आशा स्वयंसेविका व सानिका गावडे या गट प्रवर्तक यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्या आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. रोशन पाटील, राजेंद्र भिसे, पांडुरंग कडव, तेजश्री म्हात्रे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.