। नेरळ । वार्ताहर ।
नेरळजवळील शेलू गावातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी अमृता ज्ञानेश्वर भगत हिने केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल शेलू येथील घरी जाऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य संघाकडून राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील क्लासिक गटाच्या वयोगट 47 ते 52 किलो वजनी गटात राज्याचे नेतृत्व करणारी अमृता भगत ही केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत दुसर्या क्रमांकावर राहिली. नेरळ येथील मातोश्री टिपणीस महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली अमृता हिच्या राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल शेलू येथे जाऊन सत्कार करण्यात आला.शेलू येथे हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रतिमा भेट देऊन या उदयोन्मुख क्रीडापटूचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी तिचे आई वडील, भाऊ हेदेखील आवर्जून उपस्थित होते. तर, शेलू ग्रामपंचायत सदस्य समीर मसणे, ज्येष्ठ ग्रामस्थ विलास डुकरे यांच्यासह नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अंकुश शेळके, दामत ग्रामपंचायत सदस्य किशोर घारे, नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, संघटनेचे मिलिंद विरले, वसंत डांगरे आदी उपस्थित होते.