रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

रेवदंडा-साळाव पुलावर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मिणमिणे (41) रा. साळाव हे सायकलवरून जात असताना रेवदंडा बाजूकडून साळावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने त्यांना मागून जोरदार धडक दिली. हा अपघात गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. मोटारसायकलची धडक इतकी भीषण होती की गणेश मिणमिणे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने अलिबाग शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अर्जुन यादव (52) रा. साळाव यांनी तक्रार दिली असून, मोटारसायकलस्वार मुकुंद चवरकर (26) रा. निडी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे साळाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रेवदंडा-साळाव पुलावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Exit mobile version