। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ गुरुवारी (दि.6 ) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर अर्धवट रस्ता आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील ताकई परिसरातून मित्रांचा एक गट माथेरानकडे निघाला होता. पळसदरी येथील अरुंद मार्गावर समोरून येणाऱ्या वॅगनार कारची पोशिर येथील रोहित वाघमारे यांच्या दुचाकीशी समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील अंबरनाथ येथील सोनाली हिचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक रोहित वाघमारे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर श्री स्वामी समर्थ मठाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे हलविण्यात आले. दरम्यान, कर्जत-खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून काही ठिकाणी रस्त्याची रुंदी अचानक कमी होते. तसेच आवश्यक इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स आणि रस्ते चिन्हांचा अभाव असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. सध्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रस्ता अद्याप धोकादायक अवस्थेत आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेकांनी आपला जीव गमावला असून, “पळसदरीचा अर्धवट रस्ता आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







