| पालघर | प्रतिनिधी |
मुंबई -अहमदाबाद महमार्गावरील विरारच्या शिरवली गावाजवळ एका पिशवीत महिलेचे मुंडके आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि.13) रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी एक तरुणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. काही तरुण शिरवली येथील पीर दर्गाजवळ असलेल्या आडोशाला लघुशंकेसाठी गेले होते. तेथे या तरुणांना एक पिशवी दिसली. त्या पिशवीमध्ये महिलेचे मुंडके होते. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली. मांडवी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एक रिकामी सुटकेस देखील आढळून आली. त्यात काही वस्तू होत्या. त्यामुळे या महिलेच्या मृतदेहाचे अन्य तुकडे याच परिसरात टाकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पोलीस या परिसराचा शोध घेत आहेत. या महिलेची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. या परिसरात शोध घेऊन हत्येचा सुगावा मिळविण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. ही कवटी महिलेची असून, किमान चार ते पाच दिवसांपूर्वी टाकलेली असावी अशी शक्यता मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजारे यांनी वर्तवली.