माथेरानमधील अश्‍वपालांची रस्त्यांबाबत चर्चा

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरान मधील काही रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक मुळे घोडे घसरतात. त्यामुळे घोड्यांचा मृत्यूही झाला आहे. म्हणून घोड्यांना सुरक्षितपणे चालता यावे त्यासाठी योग्य रस्ते करावेत. अशी विनंती अश्‍वपाल संघटनांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन केली. त्यावर मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी (दि.21) एम.एम.आर.डी.ए.च्या अधिकार्‍यांसमवेत तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोसरी येथील शिवतीर्थ कार्यालयात थोरवे यांची माथेरान स्थानिक अश्‍वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, माथेरान मूलवासी संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंगाडे, इरफान शेख, गणेश गावडे, विकास रांजणे, सचिन पाटील, लक्ष्मण शिंगाडे, रामा आखाडे यांनी भेट घेतली. यावेळी माथेरानच्या प्रशासक व मुख्याधिकारी सुरेखा भणगे आणि अभियंता स्वागत बिराबोळे आदी उपस्थित होते.

सर्वोच्य न्यायालयाने माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू कराव्यात असे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी माथेरान नगरपरिषद प्रयत्न करीत आहे. माथेरान मधील काही चढणीच्या रस्त्यांवर ई-रिक्षा सुरक्षित पणे चढाव्यात म्हणून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्याने पावसाळ्यात काही घोडे घसरले तर घोडा मरण पावला. आशा घटना घडू नयेत व त्यावर उपाययोजना कराव्यात. अशी मागणी अश्‍वपाल संघटनांनी केली. त्यावर हे संपूर्ण काम एमएमआरडीए करीत आहे. त्यामुळे त्यांच्या कडून याबाबतीत चर्चा करावी असे मुख्याधिकारी भणगे यांनी सूचित केले.

माथेरान मधील लोकांसाठी आपण काम करणे गरजेचे आहे. एम.एम.आर.डी.ए च्या अधिकार्‍यांसमवेत शुक्रवारीच बैठक घेऊन त्यावर चर्चा करून मार्ग काढू असा शब्द थोरवे यांनी दिला. यावेळी नगरसेवक संकेत भासे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, विधानसभा संघटक शिवराम बदे आदी उपस्थित होते.

Exit mobile version