माथेरानमध्ये घोडे परवाना नूतनीकरण

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी होणार तपासण्या

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये चालविणाऱ्या प्रवासी घोड्यांसाठी परवाना दिला जातो. यावर्षी त्या परवाना नूतनीकरणाची सर्व विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून घोड्यांची रक्ततपासणी सुरू केली असून, 460 घोड्यांची रक्त तपासणी होणार आहे.

प्रदूषणमुक्त माथेरान पर्यटनस्थळी मोटार वाहनांना बंदी असल्याने पर्यटकांना फिरण्यासाठी घोड्यांचा वापर होतो. तो घोडा सुदृढ असावा याकरिता येथे ब्रिटिशकाळापासून पशुवैद्यकीय अधिकारी यांची येथील घोडे परवाना नूतनीकरणात महत्त्वाची भूमिका असल्यामुळे त्यांच्याकडून या ठिकाणी घोडा तपासणी केली जाते. मग त्यांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलिसांकडून परवाना देण्याचे काम होते. त्याच वेळेस नगरपालिकाही प्रत्येक अश्वामागे रोड फी आकारत असते. या तिन्ही विभागाकडून परवाना नूतनीकरण केले जाते. हे नूतनीकरण प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात होत असते. पण, यावर्षी मात्र ते मे महिन्यात होणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागाचे माथेरानमधील पशु वैद्यकीय अधिकारी अमोल कांबळे यांनी येथील श्रेणी 1 दवाखान्यात ग्लॅडर रोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रक्त तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात 460 परवाना घोड्यांचे रक्त नमुना घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

घोडा हे प्रमुख वाहन असल्याने ग्लॅडर रोगापासून घोडा सुरक्षित राहिला तर पर्यटक सुरक्षित राहील. परवाना देताना घोड्याची पूर्ण तपासणीअंती आमच्याकडून प्रमाणपत्र दिले जाते. यावर्षी या तपासणीची सुरुवात रक्त नमुना घेऊन केली आहे.

अमोल कांबळे, पशु वैद्यकीय अधिकारी

ब्रिटिशकाळापासून घोडा पासिंग होत आहे. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी घोडा तपासतो. यावर्षी रक्त नमुना तपासणीने सुरुवात केली आहे. खासगी घोड्यांचीही तपासणी होणे गरजेचे आहे. कारण, ग्लॅडर रोग हा कुठल्याही घोड्याला होऊ शकतो आणि तो संसर्गजन्य रोग असल्यामुळे मालवाहतूक करणारे घोडे, खासगी घोडे यांचीसुद्धा तपासणी होणे गरजेचे आहे.

आशा कदम, अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना
Exit mobile version