। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मधील घोड्यांच्या तबेल्याला आग लागली.घोड्यांचे खाणे असलेले गवत यांच्यामुळे आग झपाट्याने वाढत गेली. लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. गुरुवारी 19 मे रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास जोरदार आग लागली. गवत असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती.लोकवस्ती असल्याने लोक जमा झाले आणि पटापट पाण्याने आग विझविण्यात आली. माजी नगरसेवक प्रदीप घावरे, अश्वपाल संघटनेचे उपाध्यक्ष गणेश घावरे, सचिव विकास रांजाणे व पालिका कर्मचारी विकास पार्टे यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यादरम्यान नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला बोलाविण्यात आले. अग्निशमन वाहनचालक अजिंक्य सुतार, अमोल सकपाळ आणि वसंत कडाळी यांनी अर्ध्यातासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
दुपारची वेळ असल्याने सर्व घोडे हे पर्यटकांच्या सेवेसाठी बाजारपेठेत होते फक्त एक घोडा पाणी पिण्यासाठी तबेल्यात उभा असताना थोडी आग घोड्यावर पडून त्यास किरकोळ दुखापत झाली. तसेच बाकी तबेला रिकामा असल्याने कोणत्याही घोड्याला दुखापत झाली नाही. पर्यटन हंगाम असल्याने एकही घोडा तबेल्यात नव्हता यामुळे मोठी जीवितहानी टळली. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.