मुंबई- पुण्यातून पशुवैद्यकीय पथकांकडून पाहणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये वाहतुकीचे साधन असलेल्या घोड्यांच्या डोळ्यांना आजार झाला आहे. घोड्यांचा आजार असाच कायम राहिल्यास काही दिवसांनी घोड्यांचे डोळे निकामी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासनाने या बाबीची गंभीर दखल घेतली असून, शहरातील सर्व घोड्यांची तपासणी सुरू असून मुंबई आणि पुण्यातून तज्ञ डॉक्टर माथेरानमध्ये पोहचले आहेत.
माथेरान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोडे असून, मालवाहतूक आणि माणसांची वाहतूक करण्यासाठी हे घोडे वापरले जातात. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची ये- जा घोड्यावरून सुरू असते आणि त्यासाठी 460 घोड्यांची मंजुरी शासनाने दिली आहे. तर शहरातील मालवाहतूक करण्यासाठी 330 घोडे असून, या सर्व घोड्यांची खरेदी महाग असल्याने घोड्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती सारखे सांभाळले जाते. घोड्यांना चारा पाणी, तसेच आजार यांच्यापासून रोखण्याचे काम अश्वपालक करीत असतात. मात्र, यावर्षी घोड्यांना वेगळ्या आजाराने ग्रासले असून शहरातील 20- 30 घोडे हे वेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत. घोड्यांचे डोळे पिवळे पडणे तसेच त्या डोळ्यातून पाणी बाहेर पडणे तसेच डोळ्यांचा रंग बदलणे असे प्रकार घडत असून, त्या घोड्यांना नंतर अंधुक दिसू लागले आहे काय? अशी शंका अश्वपालकांना सतावत आहे.
या नवीन आजारामुळे आपल्या घोड्यांना कायमचे दिसेनासे होऊन त्यांना अंधत्व येणार अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पसरलेल्या या नवीन आजारामुळे निर्माण झालेली घबराट याबद्दल समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाल्यावर गेली काही महिने गायब असलेले माथेरान येथील पशुधन दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी पुन्हा माथेरानमध्ये पोहचले आहेत. मात्र, घोड्यांचा आजार दोन- चार घोड्यावरून आता 2530 घोड्यांपर्यंत पोहचला आहे. त्याचा परिणाम माथेरानमधील अश्व संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाल्यानंतर मुंबई येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम माथेरान येथे पोहचू लागल्या आहेत.
महाविद्यालयातील पथक तपासणीसाठी
मुंबई येथील व्हॅटनिटी महाविद्यालयातील 30 डॉक्टरांचे पथकाने घोड्यांची तपासणी केली. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कांबळे यांनी माथेरान पोलीस ठाणे यांना पत्र पाठवून सर्व घोड्यांची तपासणी करण्याची परवानगी मागितली होती.
