| नेरळ | वार्ताहर ।
माथेरान या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असून माथेरानमधील सर्व जमिनीवर वन विभागाचा ताबा आहे. त्यामुळे 54 चौरस मीटर सारखा मोठा परिसर फिरण्यासाठी आणि गस्त घालण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून घोडा आहे. मात्र वन विभागाकडे असलेले दोन घोडे बाहेर काढले जात नाहीत. दरम्यान, त्यांच्या खाण्या-पिण्यावर वन विभाग खर्च करीत असून त्यांची खरेदी ज्या कारणासाठी शासनाने केली आहे, त्याचा उपयोग माथेरान वन विभाग कधी करणार? असा सवाल धनगर समाजाचे माजी अध्यक्ष राकेश कोकळे यांनी निवेदन देऊन केला आहे.
वन अधिकार्यांचे घोडे एकदाही रस्त्यावर येत नाहीत, त्यामुळे त्या घोड्यांचा देखभाल तसेच खाद्य चारा यासाठी लागणार्या पैशाचा नाहक अपव्यय होताना दिसत आहे. वन अधिकारी आणि कर्मचारी त्या घोड्यांचा अधिक प्रमाणात वापर करत नसतील तर उगाच वनखात्याच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यावेळी माथेरानमधील वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्गास घोड्यांची आवश्यकता भासेल त्यावेळी खासगी घोडे वापरले जातात. त्यामुळे शासनाने दिलेले घोडे फक्त दिखावा म्हणून आणण्यात आले आहेत काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून घोडे न वापरता त्यांच्या होणार खर्च जनतेचा असल्याने वन विभागाने आतापर्यंत या दोन्ही घोड्यांच्या देखभाल आणि निगा राखण्याचा खर्चाचा तपशील द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.