| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शासनाच्या निर्णयानुसार 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी पुनर्निर्दिष्ट हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानीपासून संरक्षण मिळणार आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंमलात केली जाणार आहे. त्यातून आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
या योजनेसाठी एम. अफ्रीड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपल्या फळपीकासाठी नोंदणी करून निश्चित मुदतीत विमा हप्ता भरावा. या योजनेत नैसर्गिक घटकांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी संरक्षण मिळणार आहे. काजू फळपीकासाठी 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अवकाळी पाऊस, कमी तापमान आणि गारपीट यांसाठी विमा लागू राहील. या विम्याचा हप्ता दर प्रती हेक्टरी 6 हजार रुपये निश्चित करण्यात आला असून विमा संरक्षण 1 लाख 20 हजार रुपये इतके आहे. आंबा फळपीकासाठी 1 डिसेंबर ते 31 मार्च तसेच 15 मेपर्यंत अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, वाऱ्याचा वेग आणि गारपीट या नैसर्गिक संकटांपासून विमा संरक्षण मिळणार आहे. या विम्याचा हप्ता दर प्रती हेक्टरी 14 हजार 450 रुपये असून 1 लाख 70 हजार रुपये विमा संरक्षण आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, फळपीकाचे छायाचित्र, तसेच अर्ज सादर करावा. नोंदणी आणि हप्ता भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. नोंदणीसाठी शेतकरी जवळच्या बँक, सीएससी केंद्र किंवा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत फळपीक विमा हप्ता भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.





