| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कार पार्कींगच्या वादावरून अलिबाग बस स्थानकातील सुरक्षा रक्षकाला एका मद्यपीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.15) दुपारच्या सुमारास घडली. मद्यपीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग एसटी स्थानकाच्या आवारात खासगी सुरक्षा रक्षक दुपारी कर्तव्य बजावत होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चारचाकी कार घेऊन एक व्यक्ती स्थानकामध्ये आला. त्याने स्थानकाच्या आवारात वाहन पार्कींग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्याला अडवून वाहन पार्कीग करण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. त्यावेळी अचानक एक व्यक्ती दारुच्या नशेत त्याठिकाणी आला. त्याने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळी करण्यासह धक्काबुक्की केली. या घटनेची माहिती स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मद्यपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांनाही शिवीगाळी व धमकी देऊ लागला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात मद्यपी विरोधात तक्रार करण्यात आली आहे. तसेच, अलिबाग स्थानकात मद्यपीसह काही अवैध व्यवसायिकांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.







