| चणेरा | प्रतिनिधी |
काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. रोहा तालुक्यात बुधवारी (दि.15) सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विशेषतः धाटाव, खांब, विरजोली, सुतारवाडी, देवकान्हे, चणेरा, तांबडी, मेढा, धामणसई आणि यशवंत खार या परिसरांमध्ये नुकसानाचे प्रमाण गंभीर असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेले भातपिक पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हतबलतेचे सावट पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून कापणीला सुरुवात केली होती; मात्र, अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे उभ्या तसेच कापणी केलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच मागील पावसामुळे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांचे उरलेसुरले पिकही आता पाण्यात बुडाले आहे.
दरम्यान, तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. परतीचा पाऊस अजून पूर्णपणे ओसरलेला नाही. अजून काही दिवस काही भागांत पावसाची शक्यता असून, ज्यांनी भातपिकाची कापणी केली आहे त्यांनी ते पिक तात्काळ झोडून घ्यावे. त्यामुळे पुढील नुकसान कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या 30 तारखेला हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीकामे करावीत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, जेणेकरून पंचनामे करून मदतीची प्रक्रिया त्वरीत सुरू करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.






