| अलिबाग | प्रमोद जाधव |
जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता राखण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे. मात्र काम नीट नसल्याचा आरोप आहे. रुग्णालयातील कामकाज 24 तास चालत असताना स्वच्छता मात्र सहा तास केली जात असल्याने डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या सर्वांचेच हाल होत आहेत.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील इमारत चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आली. 250 खाटांच्या इमारतीमध्ये बाह्य रुग्ण कक्षामार्फत सुमारे आठशेपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णांना चांगली सेवा मिळावी. परिसर स्वच्छ रहावा यासाठी पूर्वी रुग्णालयातील कर्मचारीच काम करीत होते. मात्र गेल्या काही वर्षापासून स्वच्छता राखण्यासाठी कंत्राटी कामगार नेमण्यात आले आहेत.
नागपूर येथील मे न्यू. ज्वाला सेक्युरिटी फोर्स या एजन्सीमार्फत रुग्णालयाची स्वच्छता राखली जाते. 12 कामगार या ठिकाणी काम करतात. या कामगारांना दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन व पाचशे रुपये पीएफ असे एकूण साडेसहा हजार रुपये दिले जातात. तुटपुंज्या मानधनात सकाळी आठ ते दुपारी दोन या सहा तासात स्क्वेअर फुटावर ते काम करतात. दुपारनंतर स्वच्छता कामगार नसल्याने दुपारी तीन वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत रुग्णालयात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होते. स्वच्छतागृहामधील घाणीबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव आहे. काही साहित्यदेखील तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे.
ही आहेत कामे
रुग्णालयातील सर्व वार्ड झाडून काढणे, लादी पुसणे. बाह्यरुग्ण कक्ष, रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करणे. स्वच्छतागृह साफ करणे ही कामे कामगार करतात. त्यांना स्क्वेअर फुटावर काम दिले जाते. या कामगारांसाठी महिन्याला 98 हजार 990 रुपये खर्च होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आपल्याकडे फक्त बारा कामगारांच्या भरोवश्यावर स्वच्छता राखली जाते. ते कमी पडतात. शासनाकडून व्यवस्था करण्याची हालचाली सुरु आहेत. वर्ग चारची 27 पदे रिक्त आहेत. या वर्गाचे कर्मचारी कंत्राटी स्वरुपात गेल्या आठ वर्षापासून काम करीत आहेत. सीएसआरमधून 40 जण मागविणार आहोत. दोन ते तीन महिन्यात याची अंमलबजावणी होणार आहे.
अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक