फेब्रुवारीतच उन्हाचे चटके

तापमानात दिवसागणिक वाढ, पार्‍याची चाळीशीकडे वाटचाल
उरण । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. तापमानात दिवसागणिक वाढ होत आहे. अनेक ठिकाणी सध्या पार्‍याची चाळीशीकडे वाटचाल सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यातच इतके चटके बसत असेल तर यंदाचा उन्हाळा किती कडक राहील, याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा प्रभाव कमी झाल्यामुळे हळूहळू थंडी कमी होऊन तापमानात वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरापासून पारा वाढू लागल्याने उरणकरांना आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उरणमधील सर्वच गावातील सरासरी तापमानात वाढ होऊन पारा चाळीशीकडे वाटचाल करीत आहे.

उन्हामुळे दुपारच्या सुमारास उरणकरांना दुपट्टे व स्कार्फ बांधून बाहेर पडावे लागत आहे. शिवाय पंखेही दिवस-रात्र गरगरायला लागले आहेत. त्याचवेळी पहाटेच्या सुमारास हलका गारवाही जाणवत आहे. ऊन वाढू लागल्याने शहरात रसवंतीही दिसू लागल्या आहेत. मार्च महिना उंबरठ्यावर असल्याने या आठवड्यात तापमानात आणखी वाढ अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत.
उरण परिसरात केमिकल्स कंपन्यांचे प्रदूषण, डोंगर दर्‍या नष्ट यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे. त्यामुळे यावर्षी जशी थंडीची झळ पोहचली त्यापेक्षा उन्हाची झळ अधिक तीव्र असणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत नागरिकांनी कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये. अन्यथा अनेक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उन्हाचे चटके बसू लागल्याने अनेकांची पावले ही सावली व थंड पेयाचा आस्वाद घेण्याकडे वळू लागली आहेत. तरी थंड पेयाचे प्रमाण जास्त झाले, तर त्याचा त्रास ही होऊ शकतो. शाळकरी मुले शाळा सुटल्यावर हातगाडीवरील बर्फ़ाचा गोळा किंवा थंडगार सरबत पिऊन उन्हापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतात.

Exit mobile version