अलिबागमधील हॉटेल मालकांना मिळणार कामगार विमा संरक्षण

राज्य कामगार विमा योजनेचे अतिरिक्त आयुक्त प्रणय सिन्हा यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

राज्य कामगार विमा योजना कार्यालय ठाणे येथे असून अलिबाग हे त्यांच्या कार्यक्षेत्रात येते. या योजनते सुमारे आठ हजार विमा धारक आहेत. अलिबाग तालुका हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे प्रचंड क्षमता असलेले स्थानिक केंद्र असून येथील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा लाभांची तरतूद करण्यासाठी वाव आहे. यामुळे हॉटेल धारकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा पुरविल्या जातील, असे सिन्हा यांनी यावेळी सांगितले.अलिबागमधील ईएसआय दवाखाना आधीच प्रक्रियेत असून ईएसआयला चालना देण्यासाठी लवकरच आणखी पुढाकार घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हॉटेल रॅडिसन येथे आयोजित केलेल्या बैठकित ते बोलत होते.

भारताचे 75 वे स्वतंत्र वर्ष सर्व सरकारी विभाग एकत्र येऊन साजरे करत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर राज्य कामगार विमा योजनेचे अतिरिक्त आयुक्त आणि प्रादेशिक संचालक प्रणय सिन्हा यांच्या उपस्थितीत अलिबाग येथील पंचतारांकित हॉटेल रॅडिसन येथे अलिबाग परिसरातील स्थानिक हॉटेल मालकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राज्य कामगार विमा योजनेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच कार्यक्रमात स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि विमा धारक यांचे एक फलदायी संवादी सत्र झाले.

नोकरदार वर्गाला सरकारकडून राज्य कामगार विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधांसह इतर फायदे दिले जातात. इएसआयसीच्या दवाखान्यातून लाभ मिळविण्याच्या प्रक्रियेबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. ईएसआय कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध फायद्यांची माहिती आणि नवीन बीव्हीकेवाय आणि सीआरएस सारख्या योजनांचाही सिन्हा यांनी उपस्थितांना माहिती दिली.

Exit mobile version