होतकरूचे महिला गटात अंतिम विजेतेपद

तर ओम् वर्तकनगर कुमार गटात विजेते

| ठाणे | वार्ताहर |

होतकरू मित्र मंडळाने शिवप्रबोधन मंडळाने आयोजित केलेल्या महिला गटात अंतिम विजेतेपद मिळविले. कुमार गटात हा मान ओम् वर्तकनगर स्पोर्टस् ने मिळविला. होतकरूची चैताली बोराडे महिलांत, तर ओम् वर्तकनगरचा साईराज परब कुमार गटातील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रू. दोन हजार देऊन गौरविण्यात आले. ओम् वर्तकनगर स्पोर्टस् ला या स्पर्धेत समिश्र यश लाभले. ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने स्वातंत्रवीर सावरकर मार्ग महानगर पालिका शाळा क्र. 120 च्या पटांगणावर या दोन अंतिम सामन्यांने स्पर्धेची सांगता झाली.

महिलांच्या अंतिम सामन्यात होतकरू मित्र मंडळाने ओम् वर्तकनगरचा कडवा प्रतिकार चुरशीच्या लढतीत 34-32 असा मोडून काढत विजेतेपदाच्या चषकासह रोख रू. अकरा हजार आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या वर्तकनगरला चषक व रोख रू. सात हजार वर समाधान मानावे लागले. पहिल्या सत्रात ओम् वर्तकनगरने सावध सुरुवात करीत 18-16 अशी नाममात्र आघाडी घेतली होती. पण दुसर्‍या सत्रात होतकरूच्या प्राजक्ता पुजारी, चैताली बोराडे यांनी आक्रमक चढाया करीत ही आघाडी मोडून काढत संघाला 2 गुणांनी विजय मिळवून दिला. त्यांना नंदीती बाईत, ऐश्‍वर्या राऊत यांनी धाडशी पकडी करीत मोलाची साथ दिली. त्यामुळे त्यांना या जेतेपदाचा आनंद घेता आला. वर्तकनगरच्या वैष्णवी साळुंखे, पूर्वा इंगावले, पूजा जाधव, मनीषा जैसवाल यांचा पहिल्या सत्रातील जोश दुसर्‍या सत्रात टिकला नाही. या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात होतकरूने रा.फ. नाईकचा 31-29 असा, तर ओम् वर्तकनगरने छत्रपती शिवाजीचा 38-34 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य पराभूत दोन्ही संघाना प्रत्येकी रोख रू.पाच हजार व चषक प्रदान करण्यात आले.

ओम् वर्तकनगर स्पोर्टस् ने कुमार गटाच्या अंतिम सामन्यात ग्रिफिन्स जिमखाना संघाचा 26-23 असा पराभव करीत चषक व रोख रू. अकरा हजार आपल्या नावे केले. उपविजेत्या ग्रिफिन्सला चषक व रोख रू. सात हजार वर समाधान मानावे लागले. संथ सुरुवात करीत पूर्वार्धात 12-08 अशी आघाडी घेणार्‍या वर्तकनगरला उत्तरार्धात मात्र ग्रिफिन्सने विजयासाठी चांगलेच झुंजविले. उत्तरार्धातील झटापटीच्या सुंदर क्षणांनी कबड्डी रसिकांची या सामन्यातील उत्कंठा वाढविली. अखेर पूर्वार्धातील आघाडीच्या जोरावर 3गुणांनी ओम् वर्तकनगरने बाजी मारली. साईराज परब याच्या झंझावाती चढाया त्याला सूरज कांबळेची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. ग्रिफिन्सच्या मनीष धनावडे, रोहन तुपारे यांना उत्तरार्धात सुर सापडला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

या अगोदर झालेल्या कुमारांच्या उपांत्य सामन्यात ओम् वर्तकनगरने श्री विठ्ठल संघाचा 37-14 असा, तर ग्रिफिन्सने श्री मावळी मंडळाचा 32-11 असा सहज पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य पराभूत दोन्ही संघाना प्रत्येकी रोख रू. पाच हजार व चषक प्रदान करण्यात आला. ओम् वर्तकनगरच्या वैष्णवी साळुंखेला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे, तर छत्रपती शिवाजीच्या साक्षी पाटीलला उत्कृष्ट पकडीचे खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याच बरोबर कुमार गटात ग्रिफिन्सच्या विशाल चीनीराठोडला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, तर श्री मावळीच्या अथर्व मोरेला उत्कृष्ट पकडीचा खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. या चारही खेळाडूंना प्रत्येकी रोख रू. एक हजार देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू ठरले ते रा.फ. नाईकची रोशनी माने(महिलांत), तर श्री विठ्ठल मंडळाचा सूरज सिंग(कुमार गट). दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रू एक हजार पाचशे देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version