पनवेल परिसरात घरफोड्या

मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरातील शिरढोण व खारघर या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुुकानात झालेल्या घरफोडीत मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे. शिरढोण येथील मयुर हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रॉॅनिक्स या ठिकाणी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी गज कोणीतरी अज्ञात इसमाने उचकटून त्याद्वारे आत प्रवेश करून दुकानात असलेल्या विविध कंपन्यांच्या कॉपर वायर व इतर बाथरुम फिटींगचे सामान असा मिळून जवळपास 75 हजार 725 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत खारघर सेक्टर 13 मधील गणेश सोसायटीत रतन भवर सिंग यांचे मोबाईल दुकान आहे. दुकान बंद करून ते घरी गेले असता, चोरट्यांनी रात्री दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच आतील स्मार्ट वॉच, ब्लूटूथसह इतर साहित्य आणि पंधरा हजार रोख असा एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुकानात असलेल्या सीसी टीव्हीत चोर चोरी करीत असल्याचे निदर्शनास येत असून खारघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version