चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लांबविला
| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र असलेल्या महड गावात चोरट्यांनी एका रात्रीत तीनपेक्षा अधिक ठिकाणी घरफोडी केल्याने एकच खळबळ माजली आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. चोरट्यांनी महडमधील क्र. 191 घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून त्यावाटे आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाचा दरवाजा तोडून कपाटाचे लॉकर उचकटून कपाटातील एकूण 25 हजारांची रोख रक्कम चोरी केली.
दरम्यान, छोट्या दोन ते तीन घरांतदेखील घरफोडीचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही झालेल्या चोरट्यांच्या हातात लोखंडी सळई, घरफोडीसाठी लागणारे हत्यार दिसून येत आहेत. गावातील समीर मुरकुटे, संतोष राऊत, पंढरीनाथ पाटील, शिंदे आदींच्या घरातून हजारोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यामुळे वरदविनायक महडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोसई शिवाजी जुंदरे करीत आहेत.