उरणमध्ये घरांची पडझड

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून, रहिवाशांच्या घरांची पडझड झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालक बेजार झाले आहेत. झाडे उन्मळून पडली असून, जागतिक कीर्तीच्या जेएनपीए बंदराची व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमी मेहनत घेणाऱ्या न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या इमारतीत पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांना कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उरण तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून, मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रानसई, मोठी जुई, पिरकोण, चाणजे, जासई, सारडे, कोप्रोली, चिरनेर या ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशांची कौलारू घरे पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले असून, उरण महसूल विभागाच्या माध्यमातून या नुकसानीसंदर्भात पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.



उरण जेएनपीए बंदराला जोडणारे नवीमुंबई , पनवेल शहराकडील रस्ते पाण्याखाली गेल्याने व झाडे उन्मळून पडल्याने वाहन चालक प्रवाशी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. अतिवृष्टीचा तडाखा उरण तालुक्याला बसत असताना आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी किंवा ठिकठिकाणचे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच इतर शासकीय अधिकारी आपापल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version