ऐन पावसाळ्यात कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्याभरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भवानी नडगांव येथे कविता कृष्णा घुरूप यांचे अतिवृष्टिमुळे घर कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत आजी आणि नातू थोडक्यात बचावले. मात्र, घराचे प्रचंड नुकसान झाले आहे.
महाड तालुक्यातील भवानी नडगांव या गावात शुक्रवारी (दि. 25) सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अचानक आलेला पाऊस व साेसाट्याच्या वाऱ्यामुळे घराचे छत व भिंत अचानक कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत आजी आणि नातू थोडक्यात बचावले. कविता कृष्णा घुरुप (61) आणि श्लोक निलेश घुरूप (8) रा.भवानी नडगांव असे या दुर्घटनेतून बचावलेल्या आजी आणि नातवाचे नाव आहे. घर कोसळल्याच्या मोठ्या आवाजाने गावातील ग्रामस्थ महिला नागरिक मदतीसाठी धावले आणि बळीराम सखाराम घुरूप यांच्या घरी तापुरता सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले.
ही घटना जर रात्री झाली असती तर आम्ही दोघे दगावलो असतो, अशी प्रतिक्रिया कविता कृष्णा घुरूप यांनी व्यक्त केली. परंतु, या दुर्घटनेमुळे ऐन पावसाळ्यात घुरूप कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अतिवृष्टी पावसामुळे कविता घुरूप यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी तलाठी कार्यालय मार्फत पंचनामा करण्यात आला.
पूर्ण निवारा मिळण्यासाठी शासनाने त्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच रिंकल अनंत सुकूम, पोलीस पाटील अनिल किजबिले आणि ग्रामपंचायत, भवानी नडगांव ग्रामस्थ मुंबई यांनी केली आहे. तसेच, प्रशासकीय योजनअंतर्गत तात्काळ मदत जाहीर करावी आणि घराच्या नुकसानीचे पंचनामे करून घर मिळावे आणि योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी घुरूप कुटुंबीयांनी केली आहे.






