। कोलाड । वार्ताहर ।
जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून बुधवारी (दि.24) मध्यरात्री नंतर आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गोवे येथील आदिवासी वाडीतील एका घरात पाणी शिरून घर कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र, घरातील कुटुंब बालंबाल बचावले आहे.
जिल्ह्यात गेली आठ दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कुंडलिका नदिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीचे पाणी कोलाड परिसरातील असंख्य गावातील घरात घुसून अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे. तर, याबरोबर कुंडलिका नदीची उप नदी महिसदरा नदीने ही धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी गोवे गावातील नवीन गावठाण, बौद्ध वाडी, आदिवासी वाडी येथील घरात शिरून अनेकांचे जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. यातच आदिवासी वाडीतील ताराबाई वाघमारे यांच्या घरात पाणी शिरून घर कोसळले आहे. मात्र, घरात पाणी शिरताच पाण्याची पातळी वाढल्यामुळे घरातील कुटुंब लगेच बाहेर पडले. बाहेर पडताच घर कोसळले. यामुळे घरातील कुटुंब बालंबाल बचावले. तर, येथील तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारातून असंख्य नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून अनेकांचे प्राण वाचविले आहेत. यामुळे या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.
अनेक वर्षांपासून महिसदरा नदीचा भराव पाण्याने धुपून कमी झाल्याने तसेच संवरक्षण भिंत नसल्याने पुराचे पाणी गोवे, पुई, पुगांव, मुठवली या गावातील भातशेतीत जाऊन मोठे नुकसान होते. बुधवारी आलेल्या पुरामुळे या परिसरातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या भातशेतींचे तसेच बाधित घरांचे पंचनामे करावे, अशी मागणी स्थानीकांकडून केली जात आहे.